वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाच्या (महा कॅम्पा) निधीचा प्रभावी वापर करावा. व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे या निधीतून पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महा कॅम्पाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वनसंवर्धन, गावांचे पुनर्वसन, मृद व जलसंधारण तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा उपलब्धतेसाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
संरक्षित वनक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पा निधी महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॅम्पा निधीतून करण्यात आलेल्या वनीकरण, मृदसंधारण आणि जलसंधारणाच्या कामांची उपग्रह प्रतिमा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या माध्यमातून कामांची प्रत्यक्ष स्थिती तपासून निधीचा विनियोग प्रभावीपणे झाल्याची खात्री करता येईल.
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॅम्पा निधीच्या माध्यमातून कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कुरण विकासामुळे पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होऊन ग्रामीण भागातील पशुपालकांना दिलासा मिळू शकतो.
या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, अपर मुख्य सचिव (वित्त) विकासचंद्र रस्तोगी, पर्यावरण सचिव जयश्री भोज, कृषी सचिव परिमल सिंग, ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि कॅम्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याटबोन उपस्थित होते.