ई-चलानला विरोध नाही; मात्र दंड आकारण्याच्या पद्धतीची तपासणी व्हावी – राज ठाकरे

0
7
ई-चलानला विरोध नाही; मात्र दंड आकारण्याच्या पद्धतीची तपासणी व्हावी – राज ठाकरे
ई-चलानला विरोध नाही; मात्र दंड आकारण्याच्या पद्धतीची तपासणी व्हावी – राज ठाकरे

ई-चलानला विरोध नाही; मात्र दंड आकारण्याच्या पद्धतीची तपासणी व्हावी – राज ठाकरे

वाशी, नवी मुंबई :
ई-चलानला आमचा विरोध नाही; मात्र ई-चलान ज्या पद्धतीने आकारले जातात, त्याची तपासणी होणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. वाशी, नवी मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूकदार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरे नियोजन, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक व्यवस्थेवरील पोलिसांचा ताण या मुद्द्यांवर भाष्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, वाहतुकीचा प्रश्न आपण अनेकदा भाषणांमधून मांडला आहे. मात्र, आगामी काळात हा प्रश्न आणखी गंभीर आणि व्यापक होणार आहे. देशातील वाहतूक व्यवस्था पाहिल्यानंतर देशाचे वर्तमान आणि भविष्य कसे असेल, याची कल्पना येते. केवळ उड्डाणपूल आणि मोठे पूल बांधून वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. असे प्रकल्प उभारताना वाहतुकीचे नियोजन आणि भविष्यातील गरजांचा विचार होणे आवश्यक आहे.
वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव चिंताजनक
वाहतूक व्यवस्थेतील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, आपल्याला पोलीस संरक्षण असले तरी आपल्या चालकांना सिग्नल मोडू नये, अशी सक्त ताकीद दिलेली आहे. कितीही घाई असली तरी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दररोज किती नवीन वाहनांची नोंदणी होते, किती वाहने रस्त्यावर येतात आणि कोणत्या भागात किती लोक वास्तव्यास येतात, याची पुरेशी माहिती व नियोजन नसल्यास त्याचा मोठा ताण वाहतूक व्यवस्थेवर आणि पोलिसांवर येतो, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई लोकल विस्कळीत झाल्यास काय होईल?
मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेचे उदाहरण देताना राज ठाकरे यांनी संभाव्य परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. भविष्यात कधी लोकल सेवा विस्कळीत झाली आणि प्रवाशांनी स्वतःची वाहने रस्त्यावर आणली, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे काय होईल, असा सवाल त्यांनी केला. मोठ्या पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच लोकसंख्या, वाहनसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीचा विचार करून सर्वंकष नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) वाढीचा उल्लेख करताना केवळ आर्थिक विकासाचे आकडे सांगून उपयोग नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी ठोस नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक
महाराष्ट्राच्या सत्तेची जबाबदारी आपल्या पक्षाकडे कधी येणार, याची आपण वाट पाहत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्नांना शिस्त लावण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नसून, त्यासाठी ठोस इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here