वैभववाडीत आज तालुकास्तरीय किसान गोष्टी व पशुपालक मेळावा; पशुधन व्यवस्थापन, चारा पिके आणि पशुरोग प्रतिबंधावर मार्गदर्शन
वैभववाडीत आज तालुकास्तरीय किसान गोष्टी व पशुपालक मेळावा; पशुधन व्यवस्थापन, चारा पिके आणि पशुरोग प्रतिबंधावर मार्गदर्शन
वैभववाडी :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरीय किसान गोष्टी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी तालुक्यातील मौजे मांगवली येथील सुवर्णसिंधू गिर गोशाळा (संसारेवाडी) येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
या मेळाव्यात शेतकरी आणि पशुपालकांना पशुधन व्यवस्थापन, दुभत्या जनावरांचे आहार नियोजन, पशुधनातील आजार, प्रतिबंधात्मक लसीकरण, जनावरांची काळजी, पशुधन विमा तसेच चारा पिकांची लागवड यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकरी आणि पशुपालकांना आधुनिक पशुसंवर्धन पद्धतींची माहिती मिळावी तसेच त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० ते १०.४५ या वेळेत उपस्थित शेतकरी व पशुपालकांच्या नोंदणीने होईल. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी यांच्या स्वागत व प्रास्ताविकानंतर सकाळी १०.४५ ते ११ या वेळेत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन होणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विविध मार्गदर्शनपर व तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गोकुळ संघ, कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. एम. पी. पाटील हे दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन व आहार नियोजन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पशुधनातील आजार, प्रतिबंधात्मक लसीकरण, जनावरांची काळजी व विमा तसेच चारा पिकांची लागवड या विषयांवर डॉ. स्वप्नील मारुती आंबी, पशुधन विकास अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय चारा पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती पंचायत समिती कृषी विभागाच्या एमआरजीएस शाखेमार्फत देण्यात येणार आहे.
दुपारी १ ते १.१५ या वेळेत शेतकरी-तज्ज्ञ संवाद व शंका निरसन अर्थात किसान गोष्टी आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकरी व पशुपालकांच्या विविध समस्यांवर प्रत्यक्ष चर्चा करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १.१५ ते १.४५ या वेळेत मान्यवरांची मनोगते, अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शन होईल. दुपारी २ वाजता भोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या मेळाव्याला वैभववाडी तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष श्री. मंगेश कदम आणि तालुका कृषी अधिकारी श्री. निरंजन नवनाथ देशमुख यांनी केले आहे.