महावितरणचा देशात नवा विक्रम! बॅटरीद्वारे १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा करणारी देशातील पहिली वीज वितरण कंपनी
महावितरणचा देशात नवा विक्रम! बॅटरीद्वारे १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा करणारी देशातील पहिली वीज वितरण कंपनी
मुंबई :
विकेंद्रित बॅटरी साठवणूक प्रणालीच्या माध्यमातून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठ्याचा टप्पा गाठत महावितरणने देशात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर विकेंद्रित स्वरूपात बॅटरीद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असून, राज्यातील वाढती वीजमागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे. विशेषतः सायंकाळच्या उच्चांकी वीज मागणीच्या काळात या साठवलेल्या विजेचा उपयोग होत असून, महागड्या दराने वीज खरेदी करण्याची गरज कमी होण्यास मदत होत आहे. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली.
महावितरणचा देशात नवा विक्रम! बॅटरीद्वारे १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा करणारी देशातील पहिली वीज वितरण कंपनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ७,००० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज कृषीपंपांना दिवसा पुरविण्यात येते. या प्रक्रियेत निर्माण होणारी अतिरिक्त वीज तसेच ग्रीडद्वारे उपलब्ध होणारी स्वस्त सौर ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून सायंकाळच्या वेळेत वापरण्याची व्यवस्था महावितरणने केली आहे.
या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम (बीईएसएस) योजनेत ५०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी साठवणूक व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. या प्रणालीद्वारे दोन तास वीजपुरवठा करता येत असल्याने एकूण १,००० मेगावॅट अवर वीज उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना होत आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऑक्टोबर महिन्यात उष्णतेच्या झळा अधिक जाणवत आहेत. परिणामी राज्यात विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. दिवसा सौर ऊर्जेमुळे पुरेशा प्रमाणात आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत असली, तरी सायंकाळी सौर ऊर्जेचा पुरवठा बंद झाल्यानंतर विजेची गरज भागविण्यासाठी महागड्या दराने वीज खरेदी करावी लागते. अशा परिस्थितीत बॅटरी साठवणूक प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज महावितरणसाठी दिलासादायक ठरत आहे.
महावितरणने एकूण ७५० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प उभारण्याची योजना हाती घेतली आहे. या प्रकल्पांतून दोन तासांसाठी प्रत्येकी ७५० मेगावॅट वीज उपलब्ध होणार असून, एकूण १,५०० मेगावॅट अवर वीज साठवणूक क्षमता निर्माण होईल. यापैकी १,००० मेगावॅट अवर क्षमतेचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आणखी ४,००० मेगावॅट अवर क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
या प्रकल्पांमुळे सायंकाळच्या उच्चांकी मागणीच्या वेळी खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध होण्याबरोबरच बाजारभावाच्या तुलनेत किफायतशीर दरात वीज मिळण्याचा दुहेरी फायदा होणार आहे. आगामी उन्हाळ्यात या योजनेचा राज्याला मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची अपेक्षा आहे.
देशातील पहिली वीज वितरण कंपनी
देशातील वीज वितरण कंपन्यांमध्ये विकेंद्रित वितरण जाळ्याशी संलग्न असलेले १,००० मेगावॅट अवर क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प सुरू करणारी महावितरण ही पहिली कंपनी ठरली आहे. राज्यातील एकूण ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी स्टोरेज प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिममुळे सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय स्रोतांपासून निर्माण झालेली अतिरिक्त वीज साठवून ठेवणे आणि विजेची सर्वाधिक मागणी असताना तिचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढण्यासह ऊर्जा व्यवस्थापन अधिक किफायतशीर होण्यास मदत होणार आहे.