मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे अर्ज महाडीबीटी २.० वर सुरू; मत्स्यशेतकरी व मच्छीमारांनी लाभ घ्यावा – मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

0
13
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे अर्ज महाडीबीटी २.० वर सुरू
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे अर्ज महाडीबीटी २.० वर सुरू
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे अर्ज महाडीबीटी २.० वर सुरू; मत्स्यशेतकरी व मच्छीमारांनी लाभ घ्यावा – मंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रत्नागिरी :
राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थीभिमुख २४ योजनांसाठी ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. राज्यातील जास्तीत जास्त मत्स्यशेतकरी आणि मच्छीमारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनांचा सर्वंकष आढावा घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसायिकांना शाश्वत आर्थिक समृद्धी मिळवून देणे, मत्स्यशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि मत्स्यव्यवसायातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विशेषतः शेती उत्पन्नातील अनिश्चिततेच्या काळात अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देण्यास या योजनेची मदत होणार आहे.
२८ पैकी २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा
या योजनेंतर्गत भूजलाशयीन, निमखारे पाणी आणि सागरी मत्स्यव्यवसायासाठी एकूण २८ योजनांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ६ राज्यस्तरीय, १९ जिल्हास्तरीय आणि ३ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा केलेल्या योजनांचा समावेश आहे. त्यापैकी ४ राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय आणि २ सुधारित जिल्हास्तरीय अशा एकूण २४ योजनांसाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे, अनावश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, डिजिटल सेवा गतिमान करणे आणि विभागांमधील माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी या योजनांचे ‘गव्हर्नमेंट प्रोसेस री-इंजिनिअरिंग’ (GPR) करण्यात आले आहे.
असा करा ऑनलाइन अर्ज
अर्जदारांनी सर्वप्रथम महाडीबीटी २.० पोर्टल वर प्राथमिक नोंदणी करून स्वतःचा महाडीबीटी आयडी (Maha ID) प्राप्त करावा. त्यानंतर पोर्टलवर लॉग-इन करून वैयक्तिक व आवश्यक माहिती भरून आपले प्रोफाइल पूर्ण करावे. प्रोफाइल अद्ययावत झाल्यानंतर ‘Apply for Scheme’ हा पर्याय निवडून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ अंतर्गत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा.
रत्नागिरी जिल्ह्यात मार्गदर्शन कक्ष स्थापन
रत्नागिरी जिल्हा कार्यालयात मार्गदर्शन कक्ष व संपर्क अधिकारी
योजनेची माहिती देणे, महा आयडी (Maha ID) तयार करणे आणि अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे जागेवरच निरसन करण्यासाठी जिल्हा कार्यालयात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.
यासाठी खालील संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे :

लतिका सुरेश गावडे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (मो. क्र. ९१५२५६२९७६)

रसिका रविंद्र सावंत, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (मो. क्र. ८८३०७४८८९८)

जिल्ह्यातील सर्व पात्र मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी, मच्छीमार व इच्छुकांनी विहित मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here