श्रीवर्धनमध्ये शिवसेनेत मोठे इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांच्यासह ८०० कार्यकर्त्यांचा प्रवेश

0
11
श्रीवर्धनमध्ये शिवसेनेत मोठे इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांच्यासह ८०० कार्यकर्त्यांचा प्रवेश
श्रीवर्धनमध्ये शिवसेनेत मोठे इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांच्यासह ८०० कार्यकर्त्यांचा प्रवेश

श्रीवर्धनमध्ये शिवसेनेत मोठे इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांच्यासह ८०० कार्यकर्त्यांचा प्रवेश

पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश; श्रीवर्धन तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार

श्रीवर्धन :
रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे गेली १५ वर्षे तालुकाध्यक्षपद भूषविलेले दर्शन विचारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांतील तब्बल ८०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची प्रेरणा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पक्षप्रवेशामध्ये मोहितेवाडी ग्रामस्थ, श्रीवर्धन गोठण, भट्टीचा माळ, बोर्ला येथील कार्यकर्त्यांचा समावेश होता. तसेच साखरोणे येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विचारे, बागमंडला ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध गावांतील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. पक्षात काम करताना नव्याने प्रवेश केलेल्या कोणत्याही सहकाऱ्याला अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीवर्धन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येथील प्रलंबित प्रश्न, रोजगारनिर्मिती, लघुउद्योग आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामाला प्राधान्य देऊन एकजुटीने पक्षवाढीसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार महेंद्र दळवी, श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अमोल चौगुले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य तथा युवासेना कोअर कमिटीचे सचिव विकास गोगावले, संपर्कप्रमुख अनिल नवघणे, विजुराज खुळे, तालुकाप्रमुख ओमकार शेलार, पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर, शामकांत भोकरे, नगरसेवक पिंट्या वेश्वीकर, राजू चव्हाण, शहरप्रमुख सावन तवसाळकर, अविनाश कोळंबेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धन तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here