रत्नागिरी महोत्सवाला पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती; १० दिवस सांस्कृतिक आणि क्रीडा पर्व
रत्नागिरी महोत्सवाला पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती; १० दिवस सांस्कृतिक आणि क्रीडा पर्व
रत्नागिरी :
रत्नागिरीतील क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, स्थानिक कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि नव्या पिढीला आपल्या क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने रत्नागिरी महोत्सव ग्रुप आणि रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने रत्नागिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली.
रत्नागिरी महोत्सवाला पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
यावेळी आमदार किरण (भैय्या) सामंत, महोत्सवाचे मुख्य संकल्पक सलीम पेठकर, भाऊ जोशी, शकील मोडक, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद बाबूशेठ म्हाप, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, जिल्हा परिषद सदस्य सौ. मोरे, पंचायत समिती सदस्य साक्षी कुमठेकर, शिरगावच्या सरपंच फरीदा काझी आणि उपसरपंच मिलिंद बाने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी महोत्सवाच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. २००४-०५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो आणि त्याच वर्षी या महोत्सवाची सुरुवात झाली. पहिल्या महोत्सवाचे उद्घाटनही माझ्याच हस्ते झाले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
यंदा चंपक मैदानावर रत्नागिरीकरांसाठी सलग दहा दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकार, खेळाडू आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
आयोजकांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच महोत्सवात सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.