रत्नागिरी बंदर विभागात एसीबीची मोठी कारवाई; ६० हजारांची लाच स्वीकारताना वर्ग-१ अधिकारी आणि खासगी एजंट ताब्यात
जयगड जहाजाला पोर्ट क्लिअरन्स देण्यासाठी मागितली होती ८० हजारांची लाच; हॉटेलमध्ये रचलेल्या सापळ्यात दोघेही अडकले
रत्नागिरी :
परदेशी जहाजाला ‘पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्यासाठी आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्याच्या मोबदल्यात ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. १६ नोव्हेंबर रोजी रचलेल्या सापळ्यात ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले, तर १७ नोव्हेंबर रोजी मुख्य आरोपी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ यालाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार (वय ३७) यांची रत्नागिरी येथे शिपिंग एजन्सी असून, त्यांच्यामार्फत परदेशी जहाजांना विविध सेवा आणि दुरुस्तीची कामे पुरवली जातात. नुकतेच जयगड बंदरात आलेल्या एका नादुरुस्त परदेशी जहाजाची दुरुस्ती तक्रारदारांच्या एजन्सीने पूर्ण केली होती. त्यानंतर या जहाजाची समुद्रात चाचणी (सी ट्रायल) घेण्याची परवानगी आणि पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७, वर्ग-१ अधिकारी) यांनी तडजोडीअंती ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने लाच देण्यास संमती दर्शवल्यानंतर भुजबळ यांनी समुद्र चाचणीऐवजी ‘फायर फायटिंग ट्रायल’ची परवानगी दिली. त्यानंतर १० नोव्हेंबर २०२६ रोजी पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी पुन्हा ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
हॉटेल कार्निवलमध्ये एसीबीचा सापळा
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने १६ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. यावेळी बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी फोनवरून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एकूण ८० हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये खासगी व्यक्ती मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. कोहिनूर क्रिस्टल, घाणेकर आळी, रत्नागिरी; मूळ रा. काळबादेवी) याच्याकडे देण्यास भुजबळ यांनी सांगितल्याचे तपासात समोर आले.
त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील हॉटेल कार्निवलच्या रेस्टॉरंट बारमध्ये एसीबीने सापळा रचला. सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी मिलिंद बनप याने बंदर अधिकारी भुजबळ यांच्यावतीने तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची रोकड स्वीकारली. पैसे मिळाल्याची माहिती त्याने तत्काळ फोनवरून भुजबळ यांना दिली. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने बनप याला रंगेहाथ पकडले.
यानंतर १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ यांनाही एसीबीने ताब्यात घेतले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ आणि ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, हेमंत पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, राजेश गावकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचेची मागणी झाल्यास एसीबीशी संपर्क साधा
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
नागरिकांसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
-
टोल फ्री क्रमांक : १०६४
-
कार्यालयीन दूरध्वनी : ०२३५२-२२२८९३
-
व्हॉट्सॲप क्रमांक : ७०३८३९१०६४
-
पत्ता : पोलीस उपअधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सावरकर नाट्यगृहाजवळ, मारुती मंदिर-नाचणे रोड, रत्नागिरी.


