रत्नागिरीच्या हापूस, काजू व कोकम उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची संधी; डाक विभागाची पार्सल सेवा
हापूस, काजू, कोकम, फणस प्रक्रिया उत्पादने आणि मसाल्यांच्या विक्रीला मिळणार चालना; महिला बचत गट व उद्योजकांना सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध हापूस आंबा, काजू, कोकम, फणस प्रक्रिया उत्पादने तसेच विविध मसाल्यांना आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे. भारतीय डाक विभागाने आपल्या पार्सल व्यवस्थेचे आधुनिकीकरण केले असून, या सेवेचा लाभ जिल्ह्यातील उद्योजक, महिला बचत गट, बागायतदार आणि व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), आंबा-काजू बागायतदार, प्रक्रिया उद्योग, गृहउद्योग आणि नवउद्योजकांना व्यवसायाचा विस्तार करता यावा, यासाठी डाक विभागाने विविध व्यावसायिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्पीड पोस्ट, पार्सल, बिझनेस पार्सल आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवांचा समावेश आहे.
व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी पार्सलचे ‘ट्रॅक अँड ट्रेस’, घरपोच पार्सल संकलनासाठी ‘पिकअप’, उपलब्धतेनुसार ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ (COD) आणि ‘ऑनलाइन ग्राहक पोर्टल’ यांसारख्या आधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्पादनांची सुरक्षित पाठवणी आणि वितरण प्रक्रियेवर लक्ष ठेवणे व्यावसायिकांना शक्य होणार आहे.
ई-कॉमर्सच्या वाढत्या विस्तारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला बचत गटांनाही आपली उत्पादने केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित न ठेवता देशभरातील तसेच परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पोस्ट ऑफिसचे जिल्हाभर पसरलेले जाळे लहान व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरू शकते. या सुविधांमुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
व्यावसायिक पार्सल सेवांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी उद्योजकांनी ८६६९९१९८६० या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच तालुकास्तरावर डाक विभागाच्या मार्केटिंग टीमशी संपर्क साधता येईल.
-
रत्नागिरी तालुका : गजानन करमरकर – ९४२२०१०९३०
-
संगमेश्वर तालुका : रविंद्र घडशी – ९६०४५६५६४८
-
राजापूर तालुका : संजय मटकर – ७८७५१६३१७६
-
लांजा तालुका : महेश साळसकर – ९३७०७४९५९७


