रत्नागिरीतील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २.५० कोटी; २८ नोव्हेंबरला भूमिपूजन

0
5
रत्नागिरीतील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २.५० कोटी; २८ नोव्हेंबरला भूमिपूजन
रत्नागिरीतील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २.५० कोटी; २८ नोव्हेंबरला भूमिपूजन

रत्नागिरीतील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २.५० कोटी; २८ नोव्हेंबरला भूमिपूजन

पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी उपलब्ध; ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना मिळणार नवे बळ

रत्नागिरी :
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाला आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
वाटद प्राथमिक आरोग्य केंद्र सन १९८४-८५ पासून कार्यरत असून, परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांना या केंद्रामार्फत प्राथमिक आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मात्र, अनेक वर्षे उलटल्याने केंद्राची इमारत जुनी होऊन मोडकळीस आली होती. इमारतीच्या काही भागाची किरकोळ पडझड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली.
रुग्ण, नागरिक तसेच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या अहवालानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून जुनी इमारत पाडण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगीही घेण्यात आली आहे.
नवीन इमारतीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे २.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, नवीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुसज्ज आरोग्य केंद्र उपलब्ध होणार आहे.
वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बाह्यरुग्ण सेवा, आवश्यक प्राथमिक उपचार, माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी तसेच आरोग्यविषयक जनजागृती अशा विविध सेवा पुरविल्या जातात.
नवीन इमारतीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळतील. तसेच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित व अनुकूल वातावरणात काम करता येणार आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून आरोग्य संस्थांच्या नूतनीकरणासह नवीन इमारतींची उभारणी, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे. वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेला २.५० कोटींचा निधी हा ग्रामीण आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागामार्फत नवीन इमारतीच्या बांधकामासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जात असून, हा प्रकल्प परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here