MPSC परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे उद्दिष्ट; पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा नाही, OMR पद्धतीनेच परीक्षा
MPSC परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे उद्दिष्ट; पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा नाही, OMR पद्धतीनेच परीक्षा
पुणे :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवारकेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय ‘भरती परीक्षा टास्क फोर्स’ स्थापन केली आहे. या टास्क फोर्सने पुण्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विविध भागधारकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. राज्यभरातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्सद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करावे, कार्यपद्धतीत वारंवार बदल करू नयेत आणि परीक्षाप्रक्रियेत दीर्घकालीन स्थैर्य राखावे, अशी मागणी केली आहे. तसेच विविध संवर्गांसाठी किमान पदसंख्या आधीच जाहीर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका गळतीला आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते छपाई, वाहतूक आणि वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा टास्क फोर्सचा मानस असून, ‘झिरो लीक’ हे परीक्षाप्रक्रियेतील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
उमेदवारांच्या तक्रारी व हरकतींसाठी केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि योग्य बैठक व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांवरही भर देण्यात येणार आहे. सर्व परीक्षांसाठी एकदाच नोंदणी आणि शुल्क भरण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही मांडण्यात आली.
पुढील एक वर्ष OMR पद्धतीनेच परीक्षा
टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांनी पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा न घेता OMR पद्धतीनेच परीक्षा घेण्याचा निर्णय स्पष्ट केला. त्यानंतर OMR पद्धतीने परीक्षा सुरू ठेवण्याबाबत शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेण्यात येईल.
OMR पद्धतीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि एकसमान पद्धतीने घेण्यासाठी प्रमाणित नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, देशातील विविध लोकसेवा आयोगांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास केला जात आहे. तमिळनाडू, गुजरात आणि संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. MPSC वरील वाढती जबाबदारी लक्षात घेता आयोगाचे मनुष्यबळ, तांत्रिक क्षमता आणि संस्थात्मक रचना अधिक बळकट करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.