NEET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; आमदार रोहित पवार यांची DGP सदानंद दाते यांच्याशी चर्चा
NEET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; आमदार रोहित पवार यांची DGP सदानंद दाते यांच्याशी चर्चा
विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह भेट; शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याची भूमिका
मुंबई, दि. २८
NEET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवर कोणतीही कारवाई करू नये, तसेच त्यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी मुंबईतील विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे (FIR) तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, अशी मागणी रोहित पवार आणि शिष्टमंडळाने केली. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठविला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना गप्प बसविण्याचा प्रयत्न होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी लोकशाही व्यवस्थेत मतभिन्नता व्यक्त करण्याचा आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या शिष्टमंडळात फहाद अहमद, मिलिंद अण्णा कांबळे, साम्या कोर्डे, स्वप्नील, रोहित ढाळ, सचिन काकड, आमिर काझी, चेतन पाटील, अंकुश राऊत, अर्जुन आणि रोहन शेलार यांचा समावेश होता.
NEET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी जोर धरत असून, या संदर्भातील पुढील निर्णयाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.