इचलकरंजीत MH51F नोंदणी मालिकेला २९ जुलैपासून प्रारंभ

0
12
इचलकरंजीत MH51F नोंदणी मालिकेला २९ जुलैपासून प्रारंभ
इचलकरंजीत MH51F नोंदणी मालिकेला २९ जुलैपासून प्रारंभ

इचलकरंजीत MH51F नोंदणी मालिकेला २९ जुलैपासून प्रारंभ

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांना संधी; एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ३० जुलै रोजी लिलाव

इचलकरंजी, दि. २८ :
नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांच्यामार्फत नवीन चारचाकी वाहनांसाठी MH51F ही नोंदणी मालिका २९ जुलै २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २९ जुलै रोजी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जदार हा हातकणंगले किंवा शिरोळ तालुक्यातील वाहनधारक असणे आवश्यक आहे. अर्जासोबत संबंधित नोंदणी क्रमांकासाठी निर्धारित मूळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडणे बंधनकारक राहणार आहे. धनादेश (Cheque) किंवा पे-ऑर्डर स्वीकारले जाणार नसून अशा प्रकारचे अर्ज बाद करण्यात येतील.

डिमांड ड्राफ्ट हा “DY REGIONAL TRANSPORT OFFICE ICHALKARANJI” या नावानेच काढलेला असावा. तसेच धनाकर्षाच्या मागील बाजूस अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

नवीन दोनचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी अर्जदारांनी अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट सादर करावा. २९ जुलै रोजी सायंकाळी ५ नंतर पसंती क्रमांकांची आणि लिलावासाठी पात्र ठरलेल्या क्रमांकांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
ज्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त होतील, त्या क्रमांकांचा लिलाव ३० जुलै रोजी करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रियेसाठी इच्छुक अर्जदारांनी अतिरिक्त रकमेचा स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात ३० जुलै रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील.
लिलाव प्रक्रिया ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडणार असून त्यासाठी केवळ अर्जदार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. उपस्थित राहताना अर्जदारांनी वैध ओळखपत्र, तर अधिकृत प्रतिनिधींनी प्राधिकृत पत्र आणि स्वतःचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here