नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ‘संयुक्त वैद्यकीय सेवा (CMS) परीक्षा २०२६’ साठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध संस्थांमध्ये एकूण १,३५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
या भरतीद्वारे केंद्रीय आरोग्य सेवा, भारतीय रेल्वे, नवी दिल्ली नगरपालिका परिषद (NDMC) आणि दिल्ली महानगरपालिका यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
UPSC कडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, प्रवर्ग तसेच इतर आवश्यक निकषांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तारखा :
-
ऑनलाईन अर्ज सुरू : ११ मार्च २०२६
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२६
-
लेखी परीक्षा : ०२ ऑगस्ट २०२६
या परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन UPSC कडून करण्यात आले आहे.