राज्यभरात ५.७४ लाख विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून पहिल्याच फेरीत ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून ६ जून २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरात अंदाजे २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध असून, केवळ मुंबई विभागातच ४ लाख ७७ हजार २१० प्रवेश पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या प्रवेश फेरीसाठी राज्यभरातून ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
मुंबई विभागात अर्ज लॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख १२ हजार ९१७ इतकी नोंदविण्यात आली. यापैकी १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ६ हजार १४० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. याशिवाय विविध कोट्यांतर्गत प्रवेश मिळालेल्या १ हजार ३२० विद्यार्थ्यांचा समावेश केल्यास एकूण ७ हजार ४६० प्रवेश निश्चित झाले आहेत.
शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी, दस्तऐवज पडताळणीसाठी लागणारा वेळ आणि पालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ६ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी, शुल्क भरणे आणि अन्य आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांतील उपलब्ध जागा, विविध आरक्षण प्रवर्ग, विशेष कोटे आणि प्रवेश नियमांनुसार अलॉटमेंट करण्यात आले आहे. पहिल्या फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागांच्या आधारे पुढील गुणवत्ता याद्या आणि प्रवेश फेऱ्या जाहीर करण्यात येणार असून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि पालकांना आपले अलॉटमेंट त्वरित तपासून निर्धारित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित महाविद्यालय अथवा शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.