अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खारपाडा टोलनाक्यावर संतप्त प्रतिक्रिया
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खारपाडा टोलनाक्यावर संतप्त प्रतिक्रिया
मुंबई-गोवा महामार्गवरील खारपाडा येथे पहिला टोल नाका सुरू करण्यात आल्याने रायगड जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पनवेल–पेण दरम्यान उभारण्यात आलेल्या या टोलनाक्याची वसुली कल्याण इन्फ्रा या कंपनीकडे देण्यात आली आहे. मात्र महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच टोल वसुली सुरू केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरील नागोठणे आणि कोलाड येथील उड्डाणपुलांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे कामही रखडलेले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि धोकादायक परिस्थिती कायम असताना टोल आकारणी सुरू केल्यामुळे “अपूर्ण रस्त्यावर टोल कशासाठी?” असा सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या निर्णयाविरोधात शेतकरी कामगार पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला असून महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली थांबवण्याची मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका सातत्याने होत आहे. हजारो कोटी रुपये खर्च होऊनही दहा वर्षांनंतरही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या काळात अनेक वेळा ठेकेदार बदलण्यात आले, काही ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याच्या घटना घडल्या, तर खर्च आणि प्रकल्पाच्या प्रगतीबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याची टीकाही केली जात आहे.
कोकणातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला हा महामार्ग सुरक्षित, दर्जेदार आणि पूर्णत्वास जावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.