अलिबाग जिल्हा कारागृहात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे, वेळेवर तपासणी व योग्य उपचारांचे महत्त्व समजावून सांगणे, तसेच या आजारासंदर्भातील गैरसमज दूर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह (वर्ग–२) विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत अधीक्षक विशाल बांदल यांनी केले. यावेळी प्रबोधन सामाजिक सेवा संस्था, अलिबागचे डॉ. मिलिंद पाटील तसेच उज्वल भविष्य सामाजिक संस्था, अलिबागचे डॉ. नितीन गांधी यांनी मनोगत व्यक्त करत जागतिक कर्करोग दिनाची पार्श्वभूमी, उद्देश, कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत बंद्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उज्वल भविष्य सामाजिक संस्था, अलिबागचे डॉ. राजाराम हुलबान यांनी कर्करोगाबाबत समाजात
असलेले गैरसमज दूर करण्यावर भर दिला. कर्करोग हा केवळ शारीरिक आजार नसून तो मानसिक आणि सामाजिक आव्हानही असल्याचे त्यांनी नमूद केले. या आजारामुळे रुग्णासह त्याच्या कुटुंबालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य माहिती, वेळेवर तपासणी, जागरूकता आणि उपचार मिळाल्यास अनेकांचे जीवन वाचू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास अलिबाग जिल्हा कारागृहातील रामहरी कुटे (सुभेदार), सुनील जाधव (हवालदार), अजय जावळे, सतीश जुंबळे (का. शिपाई), तसेच महिला शिपाई श्रीम. क्रांती कदम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे बंद्यांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता वाढल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित बंद्यांनी तज्ज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कर्करोगाबाबत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, व्यसनमुक्त जीवनशैली, संतुलित आहार आणि सकारात्मक मानसिकतेचा आजार प्रतिबंधात होणारा फायदा याबाबतही माहिती देण्यात आली.


