उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई l प्रतिनिधी
“बसेस वेळेवर धावल्या तरच एसटीच्या उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील”, असा स्पष्ट संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालयात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून, सुरक्षित प्रवास, स्वच्छ सेवा आणि शासनाच्या सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवा वक्तशीर नसेल तर ही वाढ टिकणार नाही.
दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगार पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करत प्रत्येक फेरी नियोजित वेळेत सुटते की नाही याची काटेकोर खात्री करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीर सेवेचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे
हक्काचा प्रवासी खासगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उत्पन्नवाढीसोबतच खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त करत मंत्री सरनाईक यांनी स्थानिक पातळीवरील नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश दिले.
“वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” असे सांगत त्यांनी प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेण्याची आवश्यकता अधोरेखित करत, तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले. वेळापत्रकाचे उल्लंघन, चालक-वाहकांचे वर्तन, तसेच सेवेतील त्रुटी याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे नियमित विश्लेषण करून त्यावर सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.


