इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषद शाळांची राज्यात चमक
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषद शाळांची राज्यात चमक
आर्या पारेकर राज्यात प्रथम
प्रतिनिधी
पूर्व माध्यमिक इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे (ता. खेड) येथील विद्यार्थिनी कु. आर्या गोरख पारेकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आर्याचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यंदाच्या राज्य गुणवत्ता यादीत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या २१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद शाळांचे असल्याने ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास व्यक्त करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.