‘ प्रज्ञाशोध परीक्षा २०२६’ कोकण विभाग आणि महाराष्ट्रात पहिलाच अभिनव उपक्रम
वि.जा.भ.ज आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रज्ञाशोध परीक्षा २०२६’ संपन्न कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम.
शासनाने घोषित केलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्ष (११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७) आणि राष्ट्रीय सांख्यिकी दिन व भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. पी. सी. महालनोबिस यांची जयंती (२९ जून २०२६) याचे औचित्य साधून इतर मागास बहुजन कल्याणतर्फे एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे.
विभागाच्या अधिनस्त वि. जा. भ. ज आश्रमशाळां मधील इयत्ता सातवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० जून २०२६ रोजी ‘प्रज्ञाशोध परीक्षा २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक आश्रमशाळा, निवे बु. येथे ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.*
ग्रामीण भागातील वि.जा.भ.ज आश्रमशाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना ‘संख्याशास्त्र (सांख्यिकी)’ विषयाची प्राथमिक ओळख व्हावी, तसेच आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात त्यांच्यात स्पर्धा परीक्षांविषयी आवड व जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण कोकण विभागात तसेच महाराष्ट्रात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.
या परीक्षेस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परीक्षेनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक अपूर्वा कारंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली, तसेच संख्याशास्त्र व स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले.
या परीक्षेत इयत्ता सातवी व नववीमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
मुंबई विभागाचे प्रादेशिक उपसंचालक दिलीप राठोड यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली आणि सहायक संचालिका अपूर्वा कारंडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्थाचालक यांनी विशेष परिश्रम घेतले.