एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नगराध्यक्षांना मार्गदर्शन; खेळांच्या मैदानांसाठी एक कोटींचा निधी जाहीर

0
10
एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नगराध्यक्षांना मार्गदर्शन; खेळांच्या मैदानांसाठी एक कोटींचा निधी जाहीर
एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नगराध्यक्षांना मार्गदर्शन; खेळांच्या मैदानांसाठी एक कोटींचा निधी जाहीर

एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नगराध्यक्षांना मार्गदर्शन; खेळांच्या मैदानांसाठी एक कोटींचा निधी जाहीर

कमी बोला, जास्त काम करा’; एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या नगराध्यक्षांना मार्गदर्शन

मुंबई :
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसाठी मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांना संबोधित करत नगर परिषदांमधील विकासकामे, प्रशासकीय अडचणी आणि स्थानिक प्रश्नांबाबत सजग राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्राधान्याने काम करण्याचे आवाहन केले.

नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचे ६३ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हजारो नगरसेवक निवडून आल्याचे नमूद करत शिंदे यांनी याला पक्षाच्या इतिहासातील महत्त्वाचे यश म्हटले. या मार्गदर्शन शिबिरातून नगर परिषदांच्या कामकाजातील वस्तुस्थिती आणि स्थानिक अडचणी समोर आल्याचे सांगत नगरविकास विभागाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘शासन आपल्या दारी’च्या धर्तीवर ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या माध्यमातून नगराध्यक्षांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नगराध्यक्षांनी ताकदीने काम करावे, असे शिंदे यांनी सांगितले. बळीराजाला सावरण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षांसह इतर पक्षांच्या नगरसेवकांशी पक्षीय मतभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवकांसाठी अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि त्यांना विविध क्षेत्रांत संधी देणारे प्रकल्प हाती घेण्याच्या सूचनाही नगराध्यक्षांना देण्यात आल्या. नमो उद्यानाच्या धर्तीवर नगर परिषद क्षेत्रातील खेळांच्या मैदानांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून गडकोटांवर स्वच्छता मोहीम सुरू असल्याची माहिती देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील उपाययोजनांचा आदर्श ठेवून गडकोटांवर संविधान दिन साजरा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला मंत्री उदय सामंत, माजी सनदी अधिकारी व मार्गदर्शक जयराज फाटक, आमदार संजय गायकवाड, शिवसेना संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेचे नगराध्यक्ष, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here