कणकवली उपनगराध्यक्ष पद भाजपकडे जाणार की शहर विकास आघाडीकडे?

0
378

कणकवली उपनगराध्यक्ष पद भाजपकडे जाणार की शहर विकास आघाडीकडे?

राजकीय समीकरणांमुळे उत्सुकता शिगेला

कणकवली l

कणकवली नगरपंचायतीच्या अलीकडील निवडणुकीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर नगरपंचायतीतील सत्तासमीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. आता उपनगराध्यक्ष पदावर भाजपचा दावा मान्य होणार की शहर विकास आघाडीचा, याकडे कणकवली शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी भाजपचे ९ तर शहर विकास आघाडीचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळाच्या आधारे भाजपने नगरपंचायतीत बहुमत असल्याचा दावा केला असून, उपनगराध्यक्ष पद भाजपकडेच जाणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, उपनगराध्यक्ष निवडीवेळी नगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार नसतो, तसेच उपनगराध्यक्षाची निवड ही थेट निवडून आलेल्या नगरसेवकांमधूनच केली जाते. त्यामुळे बहुमत असलेल्या भाजपचा उमेदवारच उपनगराध्यक्ष होणार, असा त्यांचा दावा आहे.

दुसरीकडे, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी वेगळे मत मांडले आहे. नगराध्यक्ष म्हणून आपल्याकडे एक सदस्य मत व एक निर्णायक मत (कास्टिंग व्होट) असल्यामुळे उपनगराध्यक्ष पदावर शहर विकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत असून, राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

दरम्यान, या संदर्भात नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, उपनगराध्यक्ष निवडीबाबत शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशांचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या विषयावर काही निर्णय झाल्याची माहिती असून, शासनाच्या अधिकृत मार्गदर्शनानुसारच पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाचा सुधारित अध्यादेश जाहीर होईपर्यंत उपनगराध्यक्ष पदाबाबतची स्थिती अनिश्चित राहणार आहे.

या निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी पाहता, भाजपविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत शहर विकास आघाडीची मोट बांधली होती. या आघाडीअंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षासह विविध पक्ष व गटांनी भाजपला तगडे आव्हान दिले. विशेषतः प्रभाग क्रमांक १५ आणि १७ मधील निवडणुका अत्यंत चुरशीच्या व बहुचर्चित ठरल्या.

प्रभाग १५ मधून शहर विकास आघाडीचे उमेदवार संकेत नाईक यांनी भाजपचे विश्वजित रासम यांचा पराभव केला, तर प्रभाग १७ मधून ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा १६४ मतांनी दणदणीत पराभव केला. या दोन्ही विजयांनी शहर विकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला असून, भाजपच्या राजकीय चक्रव्यूहाला छेद दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तथापि, याच प्रभागांमध्ये भाजपनेही काही ठिकाणी आघाडी घेत नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत समीर नलावडे यांना ९ मतांचे मताधिक्य मिळवले होते. मात्र अंतिम फेरीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी समीर नलावडे यांचा १४५ मतांनी पराभव करत तब्बल १७ वर्षांनंतर नगराध्यक्षपद मिळवले, हे या निवडणुकीतील महत्त्वाचे राजकीय वळण ठरले.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, कणकवली नगरपंचायतीतील उपनगराध्यक्ष पदाचा तिढा शासनाच्या निर्णयावरच सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तोपर्यंत भाजप आणि शहर विकास आघाडी या दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे सुरूच राहणार असून, कणकवलीच्या राजकारणात पुढील काही दिवस रंगत कायम राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here