कणकवली तालुका पत्रकार संघाचा वनराई बंधारा उभारणी मोहिमेत सहभाग
कणकवली तालुका पत्रकार संघाचा वनराई बंधारा उभारणी मोहिमेत सहभाग
कणकवली :
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कणकवली तालुका पत्रकार संघाने वनराई बंधारा उभारणी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. आशिये ग्रामपंचायत हद्दीतील टेंबवाडी येथे पत्रकारांनी वनराई बंधारा उभारून जलसंधारण आणि जलसाक्षरतेचा संदेश समाजासमोर ठेवला.
भविष्यातील पिढीला जलसंधारणाचे महत्त्व समजावे आणि पाण्याचे संवर्धन करण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमात विद्यार्थी, पत्रकार आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्येही जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
पत्रकारांनी केवळ बातम्यांच्या माध्यमातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही सामाजिक बांधिलकी जपता येते, असा आदर्श या उपक्रमातून निर्माण केला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विद्यार्थी, पत्रकार आणि ग्रामस्थांनी वनराई बंधारा निर्मितीत सहभागी होत जलसंवर्धनाचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे पाणी अडवणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याबाबत स्थानिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले.