कवी केशवसुतांच्या भूमीत घुमणार साहित्याची ‘तुतारी’; मालगुंडमध्ये २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कोमसापचे मध्यवर्ती साहित्य संमेलन

0
12
कवी केशवसुतांच्या भूमीत घुमणार साहित्याची ‘तुतारी’
कवी केशवसुतांच्या भूमीत घुमणार साहित्याची ‘तुतारी’

कवी केशवसुतांच्या भूमीत घुमणार साहित्याची ‘तुतारी’; मालगुंडमध्ये २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कोमसापचे मध्यवर्ती साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाच्या ध्वज व बोधचिन्हाचे अनावरण; साहित्य माणसाला माणसाशी जोडते – प्रशांत सातपुते

रत्नागिरी :
आधुनिक मराठी काव्याचे जनक कवी केशवसुत यांच्या पावन जन्मभूमीत, मालगुंड येथे साहित्याची ‘तुतारी’ घुमणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्ह यांचे अनावरण जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. हे संमेलन २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मालगुंड येथे होणार आहे.

“कोकणच्या मातीत शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज असते. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचे आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच आहे,” असे भावस्पर्शी प्रतिपादन प्रशांत सातपुते यांनी केले.
या अनावरण सोहळ्याला कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे आणि माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
साहित्यध्वज म्हणजे संवेदनशीलतेला साद
संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्ह हे केवळ कापडाचा तुकडा किंवा चित्राची रेषा नसून साहित्य, संस्कृती, विचार आणि रसिकतेची पताका आहे. हा ध्वज आकाशात डोलू लागतो, तेव्हा तो केवळ सोहळ्याची घोषणा करत नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील संवेदनशीलतेला साद घालतो, असे सातपुते यांनी सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषदेने गेल्या अनेक वर्षांपासून कोकणचा सांस्कृतिक आणि भाषिक ठेवा जपला आहे. कवी केशवसुत स्मारकाच्या साक्षीने उभा राहणारा हा साहित्यकुंभ नव्या विचारांची, संवादांची आणि साहित्यप्रेमींच्या सहभागाची नवी लाट निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी संमेलनाला शब्दांची, विचारांची आणि संस्कृतीची भव्य पालखी बनवण्यासाठी सर्वांनी साहित्यध्वजाच्या छायेत एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तरुणांमध्ये वाचन-लेखनाची ऊर्मी निर्माण व्हावी : नमिता कीर
साहित्य माणसाला जगण्याचा विचार देते आणि जीवन अधिक सुंदर बनवते. त्यामुळे साहित्य संमेलने केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत आणि नव्या पिढीतील तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी व्यक्त केले.
कोमसापने गेल्या ३५ वर्षांच्या प्रवासात मॉरिशस आणि कॅनडासारख्या देशांमध्येही संमेलने आयोजित करून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी नमूद केले. १९९१ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुत स्मारक उभारणीचा आणि कोमसाप स्थापनेचा संकल्प याच भूमीतून केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
तरुणांच्या हातात लेखणी यावी आणि त्यांनी साहित्याच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत, हा अशा संमेलनांचा प्रमुख उद्देश असल्याचे कीर यांनी स्पष्ट केले. आगामी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके असल्याने साहित्य आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घातली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संस्मरणीय संमेलनासाठी विशेष ग्रंथदिंडीचे आयोजन
मालगुंड येथील केशवसुत स्मारकात होणारे हे साहित्य संमेलन अखिल भारतीय स्तरावरील संमेलनाच्या दर्जाचे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि तरुण पिढीला साहित्याशी जोडण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून विशेष ग्रंथदिंडी आयोजित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक यांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साहित्य वाचनाचे संस्कार रुजवणे काळाची गरज : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ
वर्गखोल्या आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवी पिढी घडवण्यासाठी साहित्य आणि वाचनाचे संस्कार रुजवणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद करत त्यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. परिवहन विभाग आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने सुमारे १ लाख ६० हजारांहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त मराठी शिकवण्याचा उपक्रम राबवण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाळ फोंडके आणि मॉरिशसच्या राजदूतांची उपस्थिती अपेक्षित
या संमेलनाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके तसेच मॉरिशसच्या राजदूत शीला बापू उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. शीला बापू या मूळच्या सावंतवाडीच्या कन्या आहेत.
कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन माधव अंकलगे यांनी केले. कवी केशवसुतांच्या स्मृतींना उजाळा देणारे आणि कोकणच्या साहित्य-संस्कृतीचा वारसा पुढे नेणारे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी महत्त्वाचे पर्व ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here