कॅन्सरवर मात करणाऱ्या ‘खऱ्या नवदुर्गांसोबत’ ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी साजरा केला नवरात्रोत्सव
मुंबई l प्रतिनिधी
इंडियन कॅन्सर सोसायटीच्या रिहॅब सेंटरच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या आणि सध्या या आजाराशी लढा देत असलेल्या रणरागिणी भगिनींसोबत ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी नवरात्रोत्सव साजरा केला. या वेळी त्यांनी भगिनींच्या ओट्या भरून सणाचा आनंद द्विगुणित केला. तसेच रिहॅब सेंटरला भेट देऊन तेथील विविध कार्यशाळांची माहिती घेतली.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी जिद्दीने लढा देत जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहणाऱ्या या भगिनींच्या चेहऱ्यावरील हास्याने मनाला स्पर्श केला. कितीही कठीण प्रसंग आला, तरी हार न मानता खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्या संघर्षातून मिळते, असे ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी नमूद केले.
जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर संकटांचा सामना करणाऱ्या या भगिनींनी आनंदाने गरबा रास खेळत नवरात्रोत्सवात सहभाग घेतला. या भावस्पर्शी क्षणाचे वर्णन करताना त्यांनी या भगिनींना ‘खऱ्या नवदुर्गा’ असे संबोधले.
हा सुंदर योग जुळवून आणल्याबद्दल ‘नाविन्य पैठणी’च्या सोनाली बने आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या संपूर्ण टीमचे ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी मनःपूर्वक आभार मानले.