केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची नितेश राणे यांनी घेतली भेट
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची नितेश राणे यांनी घेतली भेट
‘सागरमाला २.०’ अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांवर चर्चा
नवी दिल्ली :
महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा विकास, किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री Sarbananda Sonowal यांची परिवहन भवन, नवी दिल्ली येथे राज्याचे मंत्री Nitesh Rane यांनी भेट घेतली.
या बैठकीत महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरे व किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, किनारी जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्गांना प्रोत्साहन देणे तसेच सागरी पर्यटनाच्या विकासाला गती देणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘सागरमाला २.०’ अंतर्गत महाराष्ट्रासाठी प्रस्तावित विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील बंदरे अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनविण्यासोबतच किनारी भागातील रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला.
‘विकसित भारत @ २०४७’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेच्या अनुषंगाने या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महाराष्ट्रातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
या बैठकीमुळे महाराष्ट्रातील बंदर, मत्स्यव्यवसाय, जलवाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला आगामी काळात नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.