
‘महसूल समाधान शिबीर अभियान’ यशस्वी करण्यासाठी प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
ओरोस :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी Trupti Dhommise यांनी दिले.
दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
अभियानाची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रभावी नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पात्र महिला शेतकरी लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पूर्वतयारीत पूर्ण करून शिबिराच्या दिवशी शेतकरी दाखले वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आल्या.
बैठकीत अॅग्रीस्टॅक (AgriStack) योजनेच्या अंमलबजावणीचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

