खेळाडूंच्या कष्टाला प्रोत्साहन; पारितोषिकांमध्ये भरीव वाढ
खेळाडूंच्या कष्टाला प्रोत्साहन; पारितोषिकांमध्ये भरीव वाढ
नॅशनल गेम्स, खेलो इंडिया आणि दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धांचाही रोख पारितोषिक योजनेत समावेश
मुंबई :
महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या रोख पारितोषिकांमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. नॅशनल गेम्स, खेलो इंडिया तसेच दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांसाठी आता सुवर्णपदकासाठी ₹७ लाख, रौप्यपदकासाठी ₹५ लाख आणि कांस्यपदकासाठी ₹३ लाख पारितोषिक देण्यात येणार आहे.
वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे ₹१० लाख, ₹७ लाख आणि ₹५ लाख, तर खेलो इंडिया स्पर्धेसाठी अनुक्रमे ₹३ लाख, ₹२ लाख आणि ₹१ लाख पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिकमधील यशस्वी खेळाडूंच्या पारितोषिकांमध्येही वाढ करण्यात आली आहे. टेनिसमधील ग्रॅण्ड स्लॅम विजेत्यास ₹३ कोटी, तर उपविजेत्यास ₹२ कोटी पारितोषिक मिळणार आहे. बॅडमिंटन आणि हॉकीमधील निवडक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
खेळाडूच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांनाही खेळाडूला मिळणाऱ्या पारितोषिकाच्या १० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे.
कर्णबधीर, अंध आणि विशेष ऑलिम्पिकसह विविध दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीही स्वतंत्र पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच स्पर्धेत सहभागी देशांच्या संख्येच्या आधारे १०० टक्के, ५० टक्के किंवा २५ टक्के पारितोषिक देण्याची नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे खेळाडूंसोबतच त्यांच्या प्रशिक्षकांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळणार असून, महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला अधिक चालना आणि नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे.