गणेशोत्सवात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा - पालकमंत्री भरतशेठ गोगावले
गणेशोत्सवात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा – पालकमंत्री भरतशेठ गोगावले
रायगड :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रशासनाला विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गणेशोत्सव काळात नागरिकांना मुबलक वीज व पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करावेत आणि आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
वाहतूक कोंडी तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात २० टोईंग क्रेन आणि २० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी २५ मोटारसायकली तैनात करण्यात येणार असून सुरक्षेसाठी ४०० होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी १० ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार असून येथे पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत तसेच पोलीस मदत कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गणेशभक्तांच्या प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या देण्यापूर्वी मंडप, उंची, विद्युत व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर तपासणी करावी, असेही पालकमंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि उत्सव आनंददायी होण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज झाले असून, वीज, पाणी, वाहतूक आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.