‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेची धाराशिवमधून सुरुवात करणार – उद्योगमंत्री उदय सामंत
नवउद्योजकांना १ कोटीपर्यंत अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न
धाराशिव :
राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देऊन युवकांना रोजगार देणारे उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, या उपक्रमाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकारातून धाराशिव येथे आयोजित भव्य नोकरी महोत्सवाला उपस्थित राहून मंत्री सामंत यांनी हजारो तरुण-तरुणींशी संवाद साधला. युवकांच्या हाताला काम देणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांनी केवळ नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता भविष्यात स्वतः रोजगार निर्माण करण्याबरोबरच इतरांनाही नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘गाव तिथे उद्योजक’ या संकल्पनेअंतर्गत गावागावांत सर्वेक्षण करून नवउद्योजकांचा शोध घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र नवउद्योजकांना ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले.
याशिवाय धाराशिव जिल्ह्यात संरक्षण क्षेत्रातील उद्योग, लॉजिस्टिक पार्क आणि एमआयडीसीच्या विकासासंदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर आणि सर्व आयोजकांचे मंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केले.


