गॅस टंचाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; काळाबाजाराविरोधात कारवाईची मागणी
मुंबई
देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, याविरोधात ‘मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)’च्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जोरदार निदर्शने केली. प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ आणि वाढती टंचाई यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच गॅस एजन्सीकडून होत असलेल्या कथित काळाबाजाराविरोधात कठोर कारवाई करून संबंधित एजन्सींचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, आगामी सण-समारंभ व लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर पुरेशा साठ्याची व्यवस्था करावी, तसेच गॅस टंचाईचा फायदा घेत इलेक्ट्रिक उपकरणे व इतर वस्तूंची अवास्तव दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. पेट्रोल पंपांवरील काळाबाजार रोखण्यासाठीही उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
या मागण्यांसंदर्भात मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद (आण्णा) कांबळे, सहअध्यक्ष सुहेल सुबेदार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


