गोठोस येथे गादीवाफा पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक; कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम
गोठोस येथे गादीवाफा पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक; कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम
गोठोस –
भात लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे या उद्देशाने गोठोस येथे गादीवाफा पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. हे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी विष्णू ताम्हणेकर यांच्या शेतात आयोजित करण्यात आले होते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील कृषिरत्न (RAWE) कार्यक्रमातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.
प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना गादीवाफा पद्धतीचे महत्त्व, त्याची तयारी आणि लागवडीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. तसेच कमी बियाणे, पाण्याची बचत, निरोगी रोपे, मजुरी खर्चात कपात आणि उत्पादनवाढ यांसारखे या पद्धतीचे विविध फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले.
या उपक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विरेश चव्हाण आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली.
गोठोस परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात पाहण्याची संधी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आगामी भात हंगामात गादीवाफा पद्धतीचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.