लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवरील विशेष सवलत रद्द

0
19
लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवरील विशेष सवलत रद्द
लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवरील विशेष सवलत रद्द

लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवरील विशेष सवलत रद्द

परवानाधारक औषधविक्रेत्याकडूनच विक्री बंधनकारक

🔥 दैनिक सिंधुदुर्ग समाचार

नवी दिल्ली, दि. १५ : केंद्र सरकारने देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी लागू असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधे नियम, १९४५ मध्ये सुधारणा करून हा निर्णय लागू केला आहे.
मंत्रालयाने २९ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अनुसूची ‘के’ मधील नोंद क्रमांक १३(७) मध्ये बदल करण्यात आला असून त्यातून ‘सिरप’ हा शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी उपलब्ध असलेली सवलत आता लागू राहणार नाही.
यापूर्वी एक हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये परवानाधारक औषधविक्रेता उपलब्ध नसल्यास काही अटींवर कफ सिरपची विक्री करण्यास परवानगी होती. मात्र नव्या नियमांनुसार ही सवलत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे आता देशातील सर्व गावांमध्ये कफ सिरपची विक्री आणि वितरण औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करूनच करावे लागणार आहे. तसेच कफ सिरपची विक्री केवळ परवानाधारक औषधविक्रेत्यांमार्फतच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे, संभाव्य गैरवापराला प्रतिबंध करणे आणि सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेला अधिक बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
यासोबतच औषध उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांनी संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here