चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला अखेर परवानगी

0
97
चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला अखेर परवानगी
चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला अखेर परवानगी

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला अखेर परवानगी

वेंगुर्ला I प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारी घडामोड घडली असून, चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळाला नाईट लँडिंगसाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे. डीजीसीए कडून आयएफआर लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्याने आता या विमानतळावर २४ तास, रात्रंदिवस आणि सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
या मंजुरीमुळे चिपी विमानतळाची क्षमता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. विमान पार्किंग क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता जवळपास दुपटीने वाढली आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल ११ हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केल्याने, चिपी विमानतळ देशातील प्रमुख ७५ विमानतळांच्या यादीत मानाचे स्थान मिळवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे विमानतळावरील वीजपुरवठा सुरळीत झाला आणि आवश्यक तांत्रिक अटी पूर्ण होण्यास मोठी मदत झाली. याचबरोबर खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने ही महत्त्वाची परवानगी मिळू शकली.
या संपूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी आवश्यक तो संवाद व पत्रव्यवहार राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात आला.
लवकरच मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमधून सिंधुदुर्गकडे थेट विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला अभूतपूर्व चालना मिळणार आहे. चिपी विमानतळावरील नाईट लँडिंग परवानगी ही कोकणच्या सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here