चेंदवण ग्रामपंचायतीत निराधार योजना लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न

0
107
चेंदवण ग्रामपंचायतीत निराधार योजना लाभार्थी मेळावा
चेंदवण ग्रामपंचायतीत निराधार योजना लाभार्थी मेळावा

चेंदवण ग्रामपंचायतीत निराधार योजना लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

कुडाळ :
चेंदवण ग्रामपंचायत, ता. कुडाळ येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या योजनेअंतर्गत निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले तसेच गंभीर आजारी पुरुष आणि महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “गावातील गरजू लोकांना आधार देण्याचे चांगले काम ग्रामपंचायतीने केले आहे. जोमाने काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भविष्यात जिल्हा परिषदेमार्फत लागेल ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल.” त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही केले.
ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांच्या नोंदीचा फलक लावण्यात आला होता. मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष लाभार्थी उपस्थित होते. त्यांनी योजनांची माहिती घेऊन लाभ घेतला.
या मेळाव्यामुळे गावातील गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी उपसरपंच श्री. माधव, सदस्य नारायण शृंगारे, भूपेश चेंदवणकर, माजी सरपंच उत्तरा धुरी, तंटामुक्ती अध्यक्ष गौतम चेंदवणकर, सामाजिक कार्यकर्ते बाळू कोचरेकर, अण्णा भरडकर यांच्यासह ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here