जिल्हा कारागृहातील कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

0
94
जिल्हा कारागृहातील कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
जिल्हा कारागृहातील कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

जिल्हा कारागृहातील कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

अलिबाग l प्रतिनिधी

अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम अलिबाग जिल्हा कारागृहात संपन्न झाला.

कारागृहातून मुक्त झाल्यानंतर बंद्यांनी गुन्हेगारी जीवनातून बाहेर पडून स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह प्रशासनाकडून विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांचा भाग म्हणून कौशल्य विकास कार्यक्रम (DPC 2025-26) अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र, अलिबाग यांच्या माध्यमातून पुरुष बंद्यांना दुचाकी मोटारसायकल दुरुस्ती प्रशिक्षण, तर महिला बंद्यांना ब्युटीपार्लर बेसिक व अॅडव्हान्स कोर्स देण्यात आला.

या कार्यक्रमास सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग तेजस्विनी निराळे, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अमिता पवार, अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बांदल, जिल्हा उद्योग केंद्राचे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने बंद्यांना किमान कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुढील टप्प्यात ग्रामीण प्रगती फाउंडेशन व जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ केअर सेक्टरमधील ‘होम हेल्थ ट्रेनी’ कोर्ससाठीही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बंद्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बंद्यांनी आयुष्मान भारत कार्ड काढून आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

सचिव तेजस्विनी निराळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजात नियमित जीवन जगताना कायद्याचे महत्त्व मोठे आहे. प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविलेल्या बंद्यांकडून प्रेरणा घेऊन इतर बंद्यांनीही या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. विविध रोजगार संधी उपलब्ध असून, अशा प्रशिक्षणामुळे बंदी आत्मनिर्भर होऊन रोजगार मिळवू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here