जळगाव : नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून आलेल्या एका अधिकृत पत्रामुळे जळगावसह राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. सुनावणीची तारीख समायोजित करण्याबाबत उल्लेख करताना पत्रात “टाईम मशीन कधी उपलब्ध होईल?” असा उल्लेख आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे या पत्रावर डिजिटल स्वाक्षरी असल्याने हा उल्लेख केवळ मसुद्यातील त्रुटी नसून अधिकृत पत्रव्यवहारात समाविष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे “टाईम मशीन” या शब्दप्रयोगावरून नेटिझन्सनी विनोदी टिप्पणींचा वर्षाव सुरू केला आहे.
जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ आजही टाईम मशीनची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याबाबत निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नसताना, महसूल प्रशासनाच्या पत्रात त्याचा उल्लेख झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकांनी या घटनेची तुलना प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताशी करत उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, ही बाब टंकलेखन अथवा शब्दरचनेतील त्रुटी असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी या पत्रामुळे “टाईम मशीनच्या शोधात जळगाव” हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
प्रलंबित फाईली निकाली काढण्यासाठी जर खरोखरच टाईम मशीन उपलब्ध झाले, तर सरकारी कामकाजातील विलंबाचा प्रश्न कायमचा सुटेल, अशा मिश्कील प्रतिक्रिया देखील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.