ठाणे जिल्ह्यात रुग्णवाहिकांसाठी ३४ पेट्रोल कार्डचे वितरण
ठाणे जिल्ह्यात रुग्णवाहिकांसाठी ३४ पेट्रोल कार्डचे वितरण
ग्रामीण भागातील तातडीच्या आरोग्यसेवेला मिळणार बळ; इंधन व्यवस्थेमुळे रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम व अखंडित
ठाणे :
ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शासनामार्फत प्राप्त झालेल्या ३४ पेट्रोल कार्डचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले.
या पेट्रोल कार्डच्या खात्यात दररोज नियोजित रक्कम जमा करण्यात येणार आहे. संबंधित रुग्णवाहिकांना एचपी पेट्रोल पंपावर या कार्डच्या माध्यमातून इंधन भरता येणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेतील अडचणी दूर होऊन नागरिकांना अधिक सुलभ, कार्यक्षम आणि अखंडित रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. या सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्धता आणि तत्परता वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दर्जेदार आरोग्य सेवा, सक्षम रुग्णवाहिका सेवा आणि नागरिकाभिमुख आरोग्य व्यवस्था या उद्दिष्टांच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.