लोकसहभागातून सिंधुदुर्गची कृषी जैवविविधता टिकविण्याची गरज

0
26
लोकसहभागातून सिंधुदुर्गची कृषी जैवविविधता टिकविण्याची गरज
लोकसहभागातून सिंधुदुर्गची कृषी जैवविविधता टिकविण्याची गरज

लोकसहभागातून सिंधुदुर्गची कृषी जैवविविधता टिकविण्याची गरज

शेतकरी व स्थानिक समुदायाच्या सहभागातून संवर्धनावर भर देण्याचे उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील समृद्ध कृषी जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून प्रभावी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी आणि स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून जैवविविधतेचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP सिंधुदुर्ग) सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंधुनीती सभागृहात ७ सप्टेंबर रोजी ज्ञानविनिमय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिभा वराळे बोलत होत्या.
यावेळी वराळे म्हणाल्या की, UNDPच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्थांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले आहे. जिल्हा जैवविविधतेने संपन्न असून येथील पारंपरिक बियाणे आणि गौण वनोपज यांचे लोकसहभागातून संवर्धन व व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाच प्रकल्पांचे सादरीकरण
कार्यशाळेत UNDPमार्फत SGP OP-7 अंतर्गत गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या पाच प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये बायफ पुणेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन चोरगे, पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेचे दादासाहेब यादव, भागीरथ प्रतिष्ठानचे नितीन मालवणकर, प्रेरणा फाउंडेशनचे सचिन यादव आणि फ्यूचर ग्रीन संस्थेच्या श्रद्धा यांचा सहभाग होता.
UNDP प्रतिनिधी ऊर्जस्वी सोंधी यांनी गेल्या दोन वर्षांत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. आगामी काळातही हे प्रकल्प जिल्ह्यात सुरू राहणार असून विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी उत्पादनांचे स्टॉल
कार्यशाळेच्या निमित्ताने विविध शेतकरी गटांनी कृषी उत्पादन साहित्य, कडधान्ये, भाज्या आणि पारंपरिक बियाणांचे स्टॉल लावले होते. या माध्यमातून स्थानिक कृषी उत्पादनांची तसेच पारंपरिक बियाणांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
शेतकऱ्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून प्रकल्प राबविताना आलेले अनुभव कथन केले. प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच शेतकरी, बचत गट आणि शासनाच्या विविध स्तरांवरील सहभागाबाबत अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या.
विविध मान्यवरांची उपस्थिती
कार्यशाळेस UNDP प्रतिनिधी ऊर्जस्वी सोंधी, TERI प्रतिनिधी तन्वी शर्मा, TERI प्रादेशिक समन्वयक आशा हडकऱ, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, BAIF पुणे संस्थेचे प्रकल्प अधिकारी संजय पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्था, शेतकरी गट आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
BAIF पुणेचे प्रकल्प अधिकारी संजय पाटील यांनी प्रकल्पांमुळे जिल्ह्यात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. पुढील काळातही प्रकल्पांसाठी शासन स्तरावर सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here