वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती

0
24
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती

उरण येथे कॉरिडॉरचे लोकार्पण; न्यू जेएनपीटीसह चार नवीन मालवाहतूक रेल्वे सेवांचा शुभारंभ

रायगड :
महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे उरण, रायगड येथे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.
याच कार्यक्रमात न्यू जेएनपीटी (मुंबई), न्यू साणंद, न्यू मकरपुरा आणि न्यू उंबरगाव या चार नवीन मालवाहतूक रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेएनपीटीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्याने महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचा वेग वाढण्यासोबतच वाहतूक खर्चातही घट होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रात १७८ किमी मार्गासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर देशातील पाच राज्यांतून जात असून, महाराष्ट्रातील १७८ किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशात प्रथमच या फ्रेट कॉरिडॉरवर कंटेनर स्टॅक वाहतूक केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर या प्रकल्पाला विशेष चालना दिली. भारत जागतिक पुरवठा साखळीचा (Global Supply Chain) महत्त्वाचा भाग बनत असताना लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतातील लॉजिस्टिक्स खर्च पूर्वी सुमारे १४ टक्के होता. गेल्या दहा वर्षांत तो सुमारे १० टक्क्यांपर्यंत खाली आला असून, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर हा खर्च ७ टक्क्यांपेक्षाही कमी होण्याची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
यामुळे भारताला जागतिक पुरवठा साखळीचे मोठे केंद्र बनण्यास मदत होईल तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
जेएनपीटीच्या कंटेनर हाताळणीत वाढ अपेक्षित
जेएनपीटी हे देशातील प्रमुख कंटेनर हाताळणाऱ्या बंदरांपैकी एक असून, देशातील सुमारे ५५ टक्के कंटेनर वाहतूक येथे हाताळली जाते. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान जेएनपीटीने सुमारे ३८.२७ लाख TEU कंटेनर हाताळले आहेत.
फ्रेट कॉरिडॉर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर जेएनपीटीच्या कंटेनर वाहतुकीला आणखी गती मिळणार असून, गतवर्षाच्या तुलनेत कंटेनर हाताळणीत सुमारे १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२०२९-३० पर्यंत जेएनपीटी हे दशलक्ष TEUपेक्षा अधिक क्षमता असलेल्या देशातील बंदरांपैकी पहिले बंदर म्हणून विकसित होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राची सागरी ताकद वाढणार
जेएनपीटीसोबतच वाढवण बंदराचा विकास सुरू असून, हे बंदर जेएनपीटीपेक्षा जवळपास तीनपट मोठे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
जेएनपीटी आणि वाढवण बंदराच्या विकासामुळे महाराष्ट्राला देशाची मॅरिटाइम पॉवर तसेच जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here