दसूर पाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले माऊलींच्या पादुकांचे दर्शन
दसूर पाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले माऊलींच्या पादुकांचे दर्शन
राज्याच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना
माळशिरस प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीदरम्यान दसूर पाटी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचे दर्शन घेत राज्यात चांगला पाऊस पडावा आणि सर्व जनतेचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे त्यांनी माऊलींच्या चरणी घातले. तसेच पादुकांचे दर्शन घेण्याचा योग लाभणे हे आपले मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य करण्याचाही मान मिळविला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वारीतील प्रत्येक वारकरी हा माऊलीचे जिवंत स्वरूप आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले असून, वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वारीत विक्रमी संख्येने भाविक सहभागी होत असल्याचे सांगत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांची संख्या मोजली जात असल्याची माहिती दिली. तसेच वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम आणि आरोग्य पथके यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.