देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत यश
रत्नागिरी – कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या २० व्या विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. ही स्पर्धा चर्चगेट, मुंबई येथील विद्यापीठ विद्यार्थी भवनात पार पडली.
विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयाच्या अनुष्का नागवेकर (द्वितीय वर्ष) आणि संगिता कांबळे (प्रथम वर्ष) यांनी ‘नैसर्गिक आणि कृत्रिम निर्देशकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रकल्पास सादर केले. प्रा. आसावरी मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या प्रकल्पाने अंतिम फेरीत चतुर्थ क्रमांक मिळवला. अंतिम फेरीत १६ महाविद्यालयांचा सहभाग होता. महाविद्यालयाच्या आविष्कार संशोधन समितीच्या सदस्य प्रा. मयेकरही या स्पर्धेत उपस्थित होत्या.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव आणि आविष्कार संशोधन समिती प्रमुख प्रा. सानिका कीर यांनी विशेष अभिनंदन केले.


