पालघरमधील पूरग्रस्त भागांची पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली पाहणी
पालघरमधील पूरग्रस्त भागांची पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली पाहणी
तातडीच्या मदतकार्याचे निर्देश
पालघर, दि. २५ :
पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी चिंचणी, नागझरी, किराट आणि चिंचारा या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.#
यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि तातडीच्या गरजा जाणून घेतल्या. तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या.
पूरग्रस्तांना अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश देताना मदतकार्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून पात्र कुटुंबांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत शक्य तितक्या लवकर पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे, असे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.