पालघर जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६; ४,१०० कोटींचे सामंजस्य करार
पालघर जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६; ४,१०० कोटींचे सामंजस्य करार
६,३०० हून अधिक रोजगारांच्या संधी
पालघर :
पालघर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देणे, नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पालघर जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ (District Investment Summit 2026) चे आयोजन करण्यात आले.
परिषदेत जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी सुमारे ४,१०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि फार्मा क्षेत्रातील ८७ हून अधिक कंपन्या पालघरमध्ये प्रकल्प सुरू करण्यास सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यातील स्थानिक तरुणांसाठी ६,३०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतर करावे लागू नये आणि त्यांच्या कौशल्याला स्थानिक पातळीवरच संधी मिळावी, हा या गुंतवणूक परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
नवीन औद्योगिक प्रकल्पांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येणार असून ‘ग्रीन इंडस्ट्रियल पॉलिसी’ अंतर्गत पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यावरही भर देण्यात येणार आहे.
परिषदेला विकास आयुक्त (उद्योग) डॉ. कादंबरी बालकावडे, अतिरिक्त विकास आयुक्त (मैत्री) वैभव वाघमारे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, उद्योग विभाग पालघरचे सह व्यवस्थापक उपेंद्रजी सांगळे, कोकण विभागाचे सहआयुक्त (उद्योग व सेवा) संदीपजी पाटील यांच्यासह उद्योग व प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आणि जिल्ह्यातील सुशिक्षित व कुशल तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवरच काम उपलब्ध करून देणे हे प्रमुख ध्येय असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.