बारामतीत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
बारामतीत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
छायाचित्र प्रदर्शनाचेही लोकार्पण
बारामती
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचेही लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी छायाचित्र प्रदर्शनाला भेट देत त्यांच्या जीवनातील विविध टप्पे, जनसेवेची तळमळ, विकासासाठीचे योगदान आणि अनेक अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आठवणींच्या पलीकडे… दादांचा जिवंत वारसा.” दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, कार्यपद्धती, जनहिताची बांधिलकी आणि विकासाची दूरदृष्टी आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
बारामतीसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेला वारसा आणि दाखवलेली विकासाची वाट पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पूर्णाकृती पुतळा आणि छायाचित्र दालन हे केवळ स्मृती जपणारे नसून, त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि विकासदृष्टीचा जिवंत वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमातून बारामतीकरांचे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावरील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.