बोरिवलीत २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान १२५वी ‘कोकणी बाजारपेठ’
बोरिवलीत २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान १२५वी ‘कोकणी बाजारपेठ’
दशावतार, पालखी सोहळ्यासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
मुंबई :
मराठी व कोकणी उद्योजकांना व्यवसायासाठी व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘मिशन कोकण साम्राज्य’’ च्या वतीने १२५वी ‘कोकणी बाजारपेठ’ बोरिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. २, ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांत हा महोत्सवी उपक्रम होणार आहे.
दशावतार, पालखी सोहळ्यासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
या बाजारपेठेत कोकणातील तसेच स्थानिक उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. घरगुती खाद्यपदार्थ, दागिने, साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने यांसह विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
१२५व्या कोकणी बाजारपेठेच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दशावतार, पालखी सोहळा, पोवाडा, नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे उद्योजकतेसोबतच कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.
‘मिशन कोकण साम्राज्य’च्या माध्यमातून मराठी व कोकणी उद्योजकांना उभे करणे, नव्या उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून १२५व्या कोकणी बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बाजारपेठ सायली इंटरनॅशनल स्कूल हॉल, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, गोराई रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहे. नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या १२५व्या कोकणी बाजारपेठेला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजक श्री. अजय आत्माराम यादव यांनी केले आहे.