भरधाव क्रेटा कारची धडक; शिक्षक जागीच ठार, चौघी महिला जखमी

0
135
भरधाव क्रेटा कारची धडक; शिक्षक जागीच ठार, चौघी महिला जखमी
भरधाव क्रेटा कारची धडक; शिक्षक जागीच ठार, चौघी महिला जखमी
भरधाव क्रेटा कारची धडक; शिक्षक जागीच ठार, चौघी महिला जखमी

कणकवली : मुंबई–गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील जानवली वाकडवाडी परिसरात भरधाव क्रेटा कारच्या धडकेत प्राथमिक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात रविवार, 21 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे पावणे अकराच्या सुमारास घडला.
या अपघातात साकेडी (ता. कणकवली) येथील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माईन शाळेतील प्राथमिक शिक्षक विठ्ठल भिकाजी ढवण (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल ढवण हे पत्नीला आणण्यासाठी जानवली वाकडवाडी येथे रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्याचवेळी डोंबिवलीहून मालवण-तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कार क्रमांक MH 05 DH 0037 ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ढवण हे हवेत उडून रस्त्यावर आपटले व डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अन्य चार महिलांनाही कारची धडक बसली. जखमींमध्ये जानवली येथील मीनल मनोहर गवस (वय 63) यांचा पायाचा घोटा व बरगड्यांना फ्रॅक्चर झाले असून डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच जानवली येथील सुहासिनी चंद्रकांत दळवी व शुभांगी शशिकांत गवस यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. फणसवाडी येथील विजया विजय जाधव यांच्या पायाच्या खुब्याला दुखापत झाली आहे.
सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या सुहासिनी दळवी यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक तपास केला.
क्रेटा कार चालक महेंद्र पाटील (रा. डोंबिवली) हे पत्नी व दोन मुलांसह तारकर्ली येथे पर्यटनासाठी जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून विठ्ठल ढवण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here