रेल्वेची नवीन भाडे रचना जाहीर : २६ डिसेंबर २०२५ पासून अंमलबजावणी

0
184
रेल्वेत ६,५६५ तांत्रिक पदांची मेगाभरती; २९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
रेल्वेत ६,५६५ तांत्रिक पदांची मेगाभरती; २९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

रेल्वेची नवीन भाडे रचना जाहीर : २६ डिसेंबर २०२५ पासून अंमलबजावणी

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणारी नवीन भाडे रचना जाहीर केली असून, यामध्ये सामान्य प्रवाशांना दिलासा देत उपनगरीय प्रवास आणि मासिक सीझन तिकिटांच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच साधारण (Ordinary) श्रेणीत २१५ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाडेवाढ होणार नाही.

रेल्वेच्या माहितीनुसार, २१५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी साधारण श्रेणीत प्रति किलोमीटर १ पैसा, तर मेल/एक्स्प्रेस नॉन-एसी आणि एसी श्रेणींसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ५०० किलोमीटरच्या नॉन-एसी प्रवासासाठी प्रवाशांना केवळ १० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

या भाडे रचनेमुळे रेल्वेला यंदा सुमारे ६०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मागील दशकात रेल्वेचे जाळे व सेवा मोठ्या प्रमाणात विस्तारल्या असून, सुरक्षितता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी मनुष्यबळात वाढ करण्यात आली आहे. यामुळे मनुष्यबळ खर्च १.१५ लाख कोटी रुपये, तर पेन्शन खर्च ६० हजार कोटी रुपये झाला असून, २०२४-२५ मध्ये एकूण कार्यकारी खर्च २.६३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

या वाढीव खर्चाची भरपाई करण्यासाठी रेल्वेने मालवाहतुकीवर अधिक भर देत प्रवासी भाड्यात अत्यल्प प्रमाणात बदल केल्याचे सांगण्यात आले आहे. सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत झालेल्या सुधारणा लक्षात घेता, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मालवाहतूक करणारी रेल्वे व्यवस्था ठरली आहे. सणासुदीच्या काळात १२ हजारांहून अधिक गाड्यांचे यशस्वी संचालन हेही सुधारलेल्या कार्यक्षमतेचे उदाहरण असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here