महाराष्ट्रातील ऑलिव रिडले कासव संवर्धनाला मोठे यश

0
19
महाराष्ट्रातील ऑलिव रिडले कासव संवर्धनाला मोठे यश
महाराष्ट्रातील ऑलिव रिडले कासव संवर्धनाला मोठे यश

महाराष्ट्रातील ऑलिव रिडले कासव संवर्धनाला मोठे यश

वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यंदा उल्लेखनीय यश मिळाले आहे.
२०२५-२६ हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १ हजार ७२४ कासव घरट्यांची नोंद करण्यात आली असून त्यामधून तब्बल १ लाख ८ हजार ५९६ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे.
राज्यातील एकूण उबवण यशाचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविण्यात आले असल्याची माहिती कांदळवन विभागाचे विभागीय वनअधिकारी कांचन पवार यांनी कळविले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरट्यांची नोंद झाली असून त्यामधून ५४ हजार २२७ पिल्ल्यांना समुद्रात सोडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७३८ घरट्यांमधून ५३ हजार ३२५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली असून ६९.९५ टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले.
रायगड जिल्ह्यात २२ घरट्यांमधून १ हजार ४४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

यंदाच्या हंगामात रायगडमधील आरावी, रत्नागिरीतील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे-पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी व कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांची घरटी आढळून आली.

यामुळे महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव रिडले कासवांच्या प्रजननासाठी महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे अधोरेखित झाले आहे.
समुद्री कासवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने २०१८ पासून मच्छिमारांसाठी नुकसानभरपाई योजना सुरू केली आहे.
मासेमारी दरम्यान जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांना जीवनदान देणाऱ्या मच्छिमारांना नुकसानभरपाई दिली जाते. या योजनेमुळे आतापर्यंत ४८६ समुद्री कासवांचे प्राण वाचविण्यात यश आले असून मच्छिमारांना सुमारे ६१ लाख २१ हजार ८५० रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

जखमी अथवा आजारी अवस्थेत किनाऱ्यावर आढळणाऱ्या समुद्री कासवांच्या उपचारासाठी कांदळवन कक्षामार्फत मरीन रिस्पॉन्स गटाची स्थापना करण्यात आली असून त्यात महाराष्ट्र वन विभागातील कर्मचारी (वन परिक्षेत्र अधिकारी), कांदळवन प्रतिष्ठानाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश आहे.

२०११ पासून वाईल्डलाइफ कंझर्वेशन व ॲनिमल वेल्फेअर असोशिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग (डहाणू विभाग) समुद्री कासवांसाठी उपचार व संक्रमण केंद्र डहाणू येथे चालवत आहे.
तसेच कादंळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबई व जवळपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या जखमी कासवांच्या उपचाराकरिता ऐरोली येथे कायमस्वरूपी उपचार केंद्रे सुरू असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तात्पुरती उपचार केंद्रेही कार्यरत आहेत.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित असलेले ऑलिव्ह रिडले समुद्र कासव सागरी परिसंस्थेच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
स्थानिक कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि कांदळवन कक्ष, वन विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे उपक्रम यशस्वी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here