मान्सूनपूर्व तयारीचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना
ठाणे : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून समन्वयाने पूर्वतयारी करावी, असे निर्देश Dr. Shrikrishna Panchal यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक २०२६’ मध्ये ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे तातडीने ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दरडप्रवण घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषधसाठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत, तसेच आवश्यक साधनसामुग्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत दरडप्रवण गावे, पूरप्रवण क्षेत्रे, नदीतील गाळ काढणे, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि शोध-बचाव साहित्याच्या उपलब्धतेचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती दिली. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना त्यांच्या स्तरावर तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


